एकीकडे सूर्य आग ओकत असताना अक्कलकोट एमआयडीतील अन्नपूर्णा टेक्स्टाईल कारखान्याला बुधवारी सकाळी ८:१५ च्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले.तब्बल सात तासांनंतर ही आग आटोक्यात आणली गेली.
या भीषण आगीमध्ये कारखान्यातील कच्चा व पक्का माल जळून खाक झाला. शिवाय पूर्ण पत्राशेड, इलेक्ट्रिक वायरिंग, डबलिंग मशिन, शिलाई मशिन पूर्णत: निकामी झाल्याचे सांगण्यात आले.बुधवारच्या सुटीमुळे कारखाना बंद होता. कारखाना चालू असताना ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुटीमुळे मनुष्यहानी वाचल्याच्या भावना घटनास्थळी लोकांमधून व्यक्त झाल्या.
