जोतिबा यात्रेनिमित्त मंदिर सलग ७९ तास खुले राहणार

जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस २३ एप्रिल असून जोतिबाचे मंदिर सलग ७९ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि . २२ एप्रिलच्या पहाटे श्री जोतिबा देवाचे मंदिर दरवाजे उघडल्यानंतर ते गुरुवारी दि. २५ एप्रिलच्या रात्री ११ वाजता बंद होणार आहे .भाविकांना सलग दिवस रात्र ७९ तास जोतिबा दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. बुधवार २३ एप्रिल जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिव असून या दिवशी पहाटे ५ वाजता महाभिषेक होणार आहे.

दुपारी १२ वाजता सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. सांय . ५.३५ या हस्त नक्षत्रावर श्री जोतिबाचा पालखी सोहळा श्री यमाई मंदिराकडे निघणार आहे. दरम्यान यात्रेच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्यात आली असून तहसिलदार, देवस्थान समिती, पोलिस, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जोतिबा मंदिराच्या मुख्य मार्गावरील दुकानाची ताटपत्री , छत, थाटीचे अतिक्रमणे काढुन प्रशस्त मार्ग केला.


दर्शन मंडपातील दर्शन रांगेची व्यवस्था अंतिम टप्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी पुर्ण झाली आहे. भेसळयुक्त गुलाल पेढयाची तपासणी केली जात आहे प्लॅस्टिक वापर करण्यावर प्रतिबंध केला असून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. नारळ खोबरे गुलालाचे ट्रक जोतिबा डोंगरावर येण्यास सुरुवात झाले आहेत . देवस्थान समितीने दुकान गाळे लिलाव पद्धतीने दिले असुन व्यापारी वर्ग दुकाने उभारण्यात व्यस्त आहेत. पुजारी वर्ग घर सजावट करून भाविकांना निवासाची सोय करीत आहेत.

शुक्रवारी दि. १९ कामदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर भाविक दाखल होण्यास प्रारंभ होईल. जोतिबा चैत्र यात्रेसाठी बेळगावची सासन काठी शुक्रवारी जोतिबा मंदिरात दाखल होईल. १२७ किलोमीटर आंतर चालत जोतिबा मंदिरात बेळगावची सासन काठी दाखल होईल. तीन दिवस जोतिबा डोंगरावर यांचे वास्तव असते बेळगावहून बैलगाडीतून निघालेली जोतिबा उत्सव मूर्ती शुक्रवारी दुपारी बारा १२ वाजता जोतिबा मंदिरात आगमन होईल.