कोल्हापूर शहरातील सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘अमृत-२’ योजनेतून सादर केलेल्या बापट कॅम्प झोनमधील १३९ कोटींच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने काल मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली.त्याचे पत्र महापालिकेला मिळताच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्याच्या उर्वरित कामांसाठी ४६ कोटींचा प्रस्ताव नगरोत्थान योजनेतून सादर केला आहे. त्याच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे.
शहरातील विविध नाल्यांमुळे होत असलेले पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वीही शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. त्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उपसा केंद्र, ड्रेनेज लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याशिवाय महापालिकेने बापट कॅम्प झोनमधील ड्रेनेज कामांसाठी १३९ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्याचे सादरीकरण झाल्यानंतर काही त्रुटींची पूर्तता करून तांत्रिक मंजुरी झाली होती.