सध्या राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यात हवामानाची (Weather) स्थिती नेमकी काय असेल? आज राज्यात पाऊस पडणार का? याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच उत्तर कोकण, आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाती शक्यता आहे.हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.
परंतू, या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर,धाराशिव पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्याच्या विविध भागात सक्रिय होत आहे. या काळात राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊ, झाला आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.