फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. मोडी लिपीतील हस्तलिखीत स्वरुपात ही बखर आहे. या बखरीत छत्रपती शिवराय तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्दीचा उल्लेख आहे.नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये जुनी कागदपत्रे चाळत असताना ही बखर सापडली आहे.
या बखरीतून अनेक अप्रकाशित गोष्टी उलगड्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. इतिहास संशोधक गुरुप्रसाद मूळचे कोल्हापूर येथील आहेत. सध्या ते नोकरीनिमित्त पुण्यात राहतात.
तर मनोज हे पुण्यातील असून सध्या ते नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत आहेत.दोघांनाही इतिहास संशोधन तसेच लेखनाची आवड आहे. ६ महिन्यांपूर्वी दोघेही फ्रान्स येथील ‘बीएनएफ’ हस्तलिखित विभागात जुनी कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी त्यांना मोडी लिपीमधील काही कागदपत्रे दिसून आली.
अभ्यासानंतर ही छत्रपती शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर असल्याचं समजलं.या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ आलेला आहे. याशिवाय बखरीत महाराज आणि सईबाई यांच्यातील संवाद, अफझलखानाला मारले त्यावेळी कोण लोक हजर होते? विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी, असा अनेक बारीक तपशील आहे.
छत्रपती संभाजी महाराज रायगडी आले, त्यावेळी तिथे असलेले सामान त्यांनी ताब्यात घेतले, त्याची यादीही या बखरीत असल्याचं कानिटकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बखरीची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने आम्ही दीडशे पानांचे पुस्तक प्रकाशित करीत आहोत, असंही कानिटकर म्हणाले.