विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जयंत पाटलांनी वाढवलं टेन्शन….

सांगली लोकसभा निवडणूक यंदा राज्यात गाजली. भाजपचे संजयकाका पाटील यांचे खासदारकीची हॅट्रिक करण्याचे स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केले. सांगलीच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना विशाल पाटलांनी करुन दाखवलं.सांगलीचे नेतृत्व आपण ठरवतो, असा समज करून घेणाऱ्या जयंत पाटलासमोर विशाल पाटलांनी (Vishal Patil) आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे केले असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन ते चार जागा लढवणार असल्याचे जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातली कोणत्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

सांगलीतील एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा सध्या शरद पवार गटाकडे आहे. या तीनही विधानसभासह आणखी एक जागा लढवणार असल्याचे सांगत जयंतरावांनी सांगलीत काँग्रेस नेत्यांची अर्थात खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे टेन्शन वाढवले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण आकडा सांगणार नाही, कारण पुन्हा त्यावर चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील,असा विश्वासच जयंत पाटलांनी व्यक्त केला. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.