आवळे घराण्यातील संघर्षाला पूर्णविराम! जुळली मने, कार्यकर्त्यांमधून समाधान

माजी खासदार जयवंतराव आवळे आणि स्व. किसनराव आवळे या बंधूंमध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या राजकारणापासून संघर्षाला सुरुवात झाली. एकमेकांची जिरवण्यात या दोन घराण्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठले. तत्कालीन पेठ वडगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत किसनराव आवळे यांनी अपक्ष निवडणूक लढवून जयवंतराव आवळे यांना घाम फोडला होता.

मात्र लोकनेते बाळासाहेब माने हे जयवंतराव आवळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने किसनराव आवळे यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर जनसुराज्यच्या उमेदवारीवर पुतण्या राजीव आवळे यांनी जयवंतराव आवळे यांचा पराभव करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र राजीव आवळे यांचा पराभव झाला.

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत आमदार राजू आवळे यांनाच आघाडीची उमेदवारी मिळणार हे नक्की होते. तरीही राजीव आवळे यांनी आघाडी सोडली नाही. सोमवारी आघाडीचा धर्म पाळत इचलकरंजीतील एका हॉटेलवर राजूबाबा आणि राजीव आवळे एकत्रित आले आणि तिथेच दोन घराण्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळाला. यामुळे कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.