बेंदरानिमित्त इचलकरंजी बाजारपेठा बैल सजावटीच्या रंगीबेरंगी साहित्याने फुलली

इचलकरंजी श्रबैलगाडी शर्यत आणि लाकूड शर्यतीत रममान झालेल्या इचलकरंजी परिसरात बैल शौकिनांची संख्या कमी नाही. त्यांच्यासाठी कर्नाटकी बेंदूर म्हणजे दसरा आणि दीपावलीच. दोन दिवसांवर आलेल्या बेंदरानिमित्त बाजारात खरेदीचा माहोल दिसू लागला आहे. बैलाला धुण्यापासून सजवण्यापर्यंत आणि खाण्यापासून मिरवणुकीपर्यंत नानाविध साहित्य बाजारात विक्रीस आहे.

अशा रंगीबेरंगी साहित्यात लाडक्या जिवाभावाच्या बैलाला पाहत खरेदी करताना प्रत्येकजण दिसत आहे.यंदा सूत गायब होऊन रेशीम आणि नायलॉनच्या सजावटीच्या साहित्यात रंगीबेरगी आणि विविधता अगदी ठळकपणे दिसत आहे.

यावर्षी दरवाढीची फारशी झळ सोसावी लागत नसल्याने पशुपालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभागात या कर्नाटकी बेंदुराला महत्त्‍व आहे. यावर्षी बेंदूर सणाच्या खरेदीतून शहरात मोठी उलाढाल होऊ शकते.

बैलगाडी आणि लाकूड शर्यतीमुळे सणाचा उत्साह वाढला आहे. शनिवारी २२ तारखेला शहरात सकाळपासून बैल सजावट, दुपारनंतर मिरवणूक आणि सायंकाळी कर तोडणीचा सामूहिक कार्यक्रम असणार आहेत. हा संपूर्ण दिवस बैलांप्रती साजरा करण्याच्या तयारीला वेग आला आहे.