आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवेल; माजी आमदार सुरेश हाळवणकर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वांनाच पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्क्य मिळाल्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र आहे. सध्या अनेकांनी स्वबळाचा नारा देखील हाती घेतला आहे. आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवेल अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिलेली आहे. मला विधानपरिषदेची संधी मिळाली तर कोल्हापूर जिल्ह्यात अधिक जोमाने आणि ताकदीने काम करता येईल. पण, मी अशी अपेक्षा ठेवलेली नाही.

पक्षाने मला तीनवेळा विधानसभेची उमेदवारी दिली. दोनवेळा मी आमदार झालो. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री मला पक्षाने केले होते. आज प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी भाजपाचे काम पाहतोय. पक्षात मी नेहमीच अपेक्षेने कोणतेच काम केलेले नाही. पण, पक्ष जी जबाबदारी देते ती मी स्विकारतो. आज कोल्हापूर जिल्ह्यात १० विरुध्द ० अशी स्थिती निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्याची आज गरज आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. तिथे कार्यकर्त्यांना बळ देणे अपेक्षित आहे.

आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे चांगली संधी मिळावी यासाठीच आम्ही स्वबळावरच्या निवडणुका म्हणतोय, असे मतही यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली की ते भविष्यातील नेते होतात. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. अधिकची संधी मिळावी यासाठी स्वबळावर भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढवेल, अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.