हुपरीत चांदी दुकान फोडून आठ लाखांचे दागिने लंपास!

हुपरी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रमेश शंकर मेथे यांच्या दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ८ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, दागिने तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिझाईन्स व इतर साहित्य लंपास केले. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धूमधडाका कॉर्नर येथे रमेश शंकर मेथे यांचे चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते.

मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून दुकानातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व चांदी दागिने तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिझाईन्स व इतर साहित्य असे मिळून ८ लाख किमतीचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी मेथे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले.

तसेच तिजोरीची मोडतोड करून सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती हुपरी पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला. श्वानपथकास व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत या चोरीच्या घटनेच्या तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती झाली नसल्याचे सांगण्यात आले.