दुष्काळी भाग म्हणून अनेक तालुके जगजाहीर आहेत. त्यामध्ये खानापूर घाटमाथ्याचा देखील समावेश होतो.अनेक वर्षांपासून दुष्काळ सहन केलेल्या खानापूर घाटमाथ्यावर आलेल्या टेंभूच्या पाण्यामुळे व झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे.
दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या टेंभू योजनेचे पाणी या परिसरातील खानापूर तलाव, सुलतानगादे तलाव व अग्रणी नदीत सोडले होते. या पाण्यामुळे व नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे खानापूर घाटमाथ्यावर पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
खानापूर घाटमाथ्यावरील पळशी, हिवरे, बलवडी या परिसरात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जाधववाडी, गोरेवाडी, ऐनवाडी या परिसरामध्ये भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. मात्र, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, अवकाळी, औषधांच्या वाढलेल्या किमती, वाढते रोग, दराची नसलेली शाश्वती यामुळे शेतकऱ्यांचा या पिकांकडे असणारा ओढा कमी होऊ लागला आहे.
ऊस पिकावर अवकाळी व गारपीट यांचा काही परिणाम होत नाही तसेच उसावर रोगांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस शेतीकडे बघितले जाते.ऊस लागवडीमुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मिटत असल्याने खानापूर, बेनापूर, सुलतानगादे, मोही, शेडगेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे ओढा वाढला आहे.