विट्याजवळील कार्वे एमआयडीसीत धक्कादायक माहिती तपासातून पुढे…

सध्या अनेक भागात गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. विट्याजवळील कार्वे एमआयडीसीत तीन संशयितांनी अत्तर (सेंट) बनविण्यासाठी पत्रावजा शेडची जागा भाड्याने घेतली आणि तिथे चक्क मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, या औद्योगिक वसाहतीत रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यात खिळे, मोळे, तारा बनवायचे तसेच पुठ्ठे तयार करण्याचे काम होत होते. हा व्यवसाय तीन-चार वर्षांपासून सुरू होता. काही कारणांमुळे तो कारखाना बंद पडला. कारखान्याचे शेड दोन महिन्यांपूर्वी विट्यातील एका महिलेकडून गुजरातमधील रहुदीप धानजी बोरिया, मुंबईतील सुलेमान जोहर शेख आणि बलराज अमर कातारी या तिघांनी घेतला.

कातारी हा मूळचा केरळमधील. सध्या तो विट्यात वास्तव्यास आहे. विट्यातील एका मध्यस्थामार्फत हा कारखाना भाड्याने दिला गेला. कारखान्यात अत्तर बनविले जाणार असल्याचे मूळ मालक असलेल्या महिलेला सांगितले होते. संबंधित महिलेने तिथे जाऊन एकदा खातरजमा केली होती. तेव्हा अत्तराच्या बाटल्या आणि अन्य तत्सम गोष्टी निदर्शनास आल्याचे महिलेने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. तरीही आणखी काही स्थानिक कनेक्शन आहे की कसे, याचा आम्ही तपास करणार आहोत.

पोलिसांनी कारखान्यात छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी एक डायरी मिळून आली. या डायरीमध्ये मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ बनविण्याची सर्व माहिती (एसओपी) लिहिलेली आहे. ही डायरी महत्त्वाचा पुरावा आहे. एमडी ड्रग्जप्रकरणी अटक केलेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत.

विट्यासारख्या ग्रामीण भागामध्ये एमडी निर्मितीचा कारखाना आढळल्याने यामागे मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तसेच परराज्यातील साखळी यामध्ये सामील असण्याची शक्यता गृहीत धरून तपास केला आहे. सध्या तरी मोठ्या शहरात ड्रग्ज विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचे तपासात पुढे येत आहे.