राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती व महाविकास आघाडीमधील सांगोला तालुक्यातील नेतेमंडळी विधानसभेची तयारी करू लागले आहेत. सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील कामाला लागले आहेत.तर महाविकास आघाडीमधील शेकाप पक्षातीलच डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या बंधूमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच असणार आहे.
सध्या प्रमुख नेतेमंडळींचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह भावी आमदार अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे पाटील यांनी सहकार्य केले होते. राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सरून आबा-बापू एकत्र आले होते. या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेला तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाणाने इतिहास घडविला होता. सध्या राजकीय परिस्थितीही वेगळी आहे.
विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे महायुती मधील आबा की बापू यांची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्षांमध्येही सर्व काही अलबेल आहे असे नाही. गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह त्यांचे चुलत बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलेल्या कालावधीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली आहे. यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये रस्सीखेच असणार आहे. राज्यातील युती व आघाडी कोणत्या पक्षांमध्ये कशी होते यावरच येतील घटक पक्षाची व उमेदवारीची निश्चित होईल असे चित्र दिसून येत आहे.