नूतन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची माढा तालुक्याच्या विकासाची ग्वाही!

माढा लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील बेंबळे जिल्हा परिषद गटातील गावांचा जनसंवाद दौरा केला. त्यावेळी बेंबळे येथील कार्यकर्त्यांसमवेत आयोजित बैठकीत खासदार मोहिते- पाटील बोलत होते.

दिवसभर त्यांनी शेवरे, माळेगाव, बेंबळे, घोटी, मिटकलवाडी, परिते, पिंपळनेर, सापटणे व इतरगावातून आभार प्रदर्शन व जनसंवाद दौरा सुरू केले.माढा तालुक्याच्या विकासाला मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत सदैव प्राधान्य दिले आहे.

यापुढेही मी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देणार आहे. नागरिकांनी आपल्या कोणत्याही अडीअडचणी आम्हाला कळवाव्यात, त्या निश्चितपणे सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्यातून एकूण ५३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले व बेंबळे गावाने मला अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य दिले. त्याबद्दल सर्व मतदारांचा आभारी असून बेंबळेकरांच्या समस्या सोडवण्यास मी कटिबद्ध असल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.