सांगोला ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरु करा

सांगोला ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतु या ट्रॉमा सेंटरमध्ये अत्यावश्यक यंत्रसामग्री , कर्मचारी भरती न झाल्याने ते बंद अवस्थेत आहे, तरी तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने उपयुक्त असणारी या ट्रॉमा सेंटर मध्ये सर्व सुविधा व कर्मचारी भरती करून हे केंद्र तात्काळ सुरु करावे , अशी मागणी राज्याचे आरोगयमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे.

सांगोला येथे उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरची इमारत सुसज्ज असूनही अद्याप ते कार्यान्वित करण्यात आलेले नाही. आवश्यक यंत्रसामग्री , डॉक्टर , नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे हे महत्त्वाचे ट्रॉमा निष्क्रिय स्थितीत आहे. सांगोला तालुक्यातून नागपूर -रत्नागिरी आणि इंदापूर-जत हे दोन प्रमुख महामार्ग जात असल्यामुळे या भागातील वाहतूक प्रचंड आहे. परिणामी , अपघातांची संख्या देखील जास्त आहे. अशावेळी अपघातग्रस्त रुग्णांना सांगोला सारख्या ठिकाणी योगय व वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असल्याने सादरचे ट्रॉमा सेंटर नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकते.

संध्यच्या परिस्थितीत अपघातग्रस्त रुग्णांना सोलापूर , पंढरपूर, मिरज येथे उपचार घेण्यासाठी पाठवावे लागत आहे. अशा परीस्थित रुग्णांना उपचारासाठी येणारा खर्च , वेळ यांमध्ये रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. बांधकाम पूर्ण झालेले सांगोला ट्रॉमा सेंटर तातडीने कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात , अशी आग्रही मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली आहे.