सांगोला विधानसभा मतदारसंघात…….

भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला. सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात.

सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार.पण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचा हा अभेद्य बालेकिल्ला राहिला. 60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं 2019 मध्ये नवा इतिहास रचला.

कारण परमनंट आमदार म्हणून ओळख असणाऱ्या विधिमंडळातील गणपतराव देशमुख यांनी 2019 ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे पारंपारिक विरोधक शहाजी बापू पाटील यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या. यावेळेस गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली पण अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजी बापूंचा अवघ्या 674 मतांनी विजय झाला.

आणि शेकापच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला. परंतु येणाऱ्या विधानसभेला येथील वारे शहाजी बापूंच्या विरोधात असल्याचं बोलले जात आहे. शिवसेनेतील बंड, महाविकास आघाडीवर केलेल आरोप, विवीध वायरल भाषण यामुळे शहाजी बापूंची क्रेझ बरीच झाली.

पण प्रॉपर सांगोल्यात त्यांच्या विरोधात वातावरण असल्यानं सांगोल्यात येणाऱ्या काळात शेकापचा आमदार पाहायला मिळतो? की काँग्रेस राष्ट्रवादीचा? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.