काँग्रेसचा पारंपारिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला उमेदवार उबाठा गट मागे घेईल आणि ही जागा काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी सोडली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण असं काहीच घडलं नाही. अखेर विशाल पाटलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरूद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूकीत विजयही मिळवला.
एकेकाळी काँग्रेसचा आणि वसंतदादा पाटील कुटुंबियांचा बाल्लेकिल्ला राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी काँग्रेसच्या हातून निसटला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात १९६७ पासुन २०१४ पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिलाय. यामध्ये स्वतः वसंतदादा पाटील, त्यांचे पुत्र प्रकाशबापु पाटील आणि वसंतदादांचे नातु आणि विशाल पाटलांचे बंधु प्रतिक पाटील यांचाही समावेश आहे.
जयंत पाटलांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटलांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वपरिचित आहेच. शिवाय महाविकास आघाडीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी जयंत पाटलांनीच प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वाद आता विशाल आणि जयंत पाटलांच्या रुपाने पुन्हा एकदा पुढे येतोय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. एकीकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदम तर दुसरीकडे, जयंत पाटील यांच्यात राजकीय संघर्ष रंगणार का? आणि याचा फटका महाविकास आघाडीला विधानसभेत बसणार का?