कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा शाहीर सरसेनापती पुरस्कार शाहीर गंगाराम आण्णाप्पा नलवडे (इचलकरंजी) व शाहीर कृष्णात गोपाळ जाधव (देवाळे) यांना जाहीर झाला.त्याचे वितरण परिषदेच्या ३३ व्या वार्षिक अधिवेशनात उद्या शुक्रवारी २८ तारखेला पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथे होणार आहे.
शाहीर सरसेनापती राजाराम जगताप व डॉ. कुंतीनाथ करके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. मानाचा फेटा, स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ, सन्मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. या दिवशी सरसेनापती धनाजी जाधव पुण्यतिथीनिमित्त पेठवडगाव नगरपालिकेतर्फे सकाळी दहा वाजता शोभायात्रेत शाहीर सहभागी होणार आहेत.
पुरस्कार विजेते शाहीर शाहिरी सादर करतील. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारप्राप्त शिवशाहीर राजू राऊत, लोककला अभ्यासक डॉ. आनंद गिरी, शाहीर समशेर रंगराव पाटील, शाहीर संजय गुरव यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
नागरिकांनी पारंपरिक पोशाखात शोभयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शाहीर परिषद व वडगाव नगरपालिकेतर्फे केले आहे.