हुपरी येथील हुतात्मा स्मारक परिसराला टाळे…

हुपरी परिसरात श्री अंबाबाई यात्रा भरविण्यात येते. या यात्रेनिमित्त हुतात्मा स्मारक या ठिकाणी पाळणे वाल्यांचा व्यवसाय चालतो. तसेच भेलगाडे, पाणीपुरी आणि वेगवेगळे खाद्यपदार्थांचे हातगाडे या स्मारक परिसरात लावले जातात. मात्र यावरुन यात्रा कमिटी, नगरपरिषद व ठेकेदार यांच्यातील मतभेदामुळे वाद निर्माण झाला आहे. याबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने हुपरी गावचे सर्कल व तलाठी यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकाच्या गेटला कुलूप घालून हा परिसर सील करण्यात आला आहे.

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे गेट खुले केले जाणार नाही, अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे. हुपरी गावातील यात्रेत उठलेल्या या वादामध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या आनंदा वरती विरजन पडण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकर तोडगा काढून निर्णय घ्यावा व हुपरी गावातील यात्रा शांततेत पार पाडावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.