भारत विजेतेपदापासून एक पाऊल दूर!

आयसीसी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दिमाखात धडक मारली. 27 जून (गुरुवार) रोजी गयानातील प्रॉव्हिडन्स स्टेडियमध्ये खेळवल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 68 धावांनी धूळ चारली.उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांत गारद झाला.

आता अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 29 जून रोजी ब्रिजटाउन (बार्बाडोस) येथे विजेतेपदासाठी अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

याआधी 2007 आणि 2014 च्या स्पर्धेतही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती. 2007 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. आता भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यास 11 वर्षांचा आयसीसीच्या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळही संपुष्टात येईल. भारतीय संघाने 2013 मध्ये शेवटचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.