सात ग्रामपंचायतींना एक कोटी 70 लाखांचा निधी मंजूर!

सांगोला तालुका हा दुष्काळा तालुका म्हणून ओळखला जातो. पाण्याची तीव्र टंचाई या भागात जाणवते. परंतु आता सांगोल्याचा विकास करण्यासाठी अनेक नेते मंडळींची धडपड ही सुरूच असते. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला विशेष असे स्थान प्राप्त झालेले आहेत.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यामधील सात ग्रामपंचायतींना एक कोटी 70 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे.

सांगोला तालुक्यामध्ये 76 ग्रामपंचायती असून त्यामधील बहुतांश ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इमारत निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आमदार शहाजी बापू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. हा निधी अखेरीस मंजूर झालेला आहे.