Salman Khan Firing Case : ‘भाईजान’ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी

 बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. बिष्णोई गँगने केलेल्या या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत काही आरोपींना अटक केली. त्याच वेळी नवी मुंबई पोलिसांनीदेखील आरोपीला अटक केली होती. आता, या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून बिष्णोई गँगच्या या हल्ल्याचा कट समोर आला आहे.अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिष्णोई टोळीने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी पाकिस्तानकडून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती. त्याशिवाय, ज्या शस्त्राने गायक सिद्धू मुसावाला याची हत्या करण्यात आली, ते मेड इन तुर्की असलेले जिगना शस्त्रही खरेदी करण्याची तयारी करण्यात आली होती.  ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत सलमान खानच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले की, जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते. हे सर्वजण सलमान खानचे मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होते. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपींनी सलमान खानला जीवे मारण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांना निवडण्यात आले होते.

पोलिसांनी असेही सांगितले की सर्व शूटर्स गोल्डी ब्रा आणि अनमोल बिश्नोई याच्या आदेशाची वाट पाहत होते. सूचना मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला केला असता. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे  येथे वास्तव्यास होते, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.