मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. शांततेने आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी सर्व आंदोलकांना केलंय. मात्र तरीही आज बिडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांकडून बीड-कल्याण बसवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे.
बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. रात्रीच बीड कोल्हापूर बस पेटवून दिली असताना आज पुन्हा एकदा बीड कल्याण बसवर तुफान दगडफेक करत एसटी बस फोडण्यात आली आहे. बीडच्या सराटा गाव परिसरात ही घटना घडली असून मराठा आंदोलक बस फोडून घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याने प्रशासनाची मात्र धावपळ होताना पाहायला मिळत आहे.
पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन…
धोपटेश्वर गावातील तरुणांनी मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने तात्काळ मराठा आरक्षणावर निर्णय घेऊन मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण द्यावं. अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या तरुणांकडून करण्यात आली आहे. सरकारने आरक्षणाबाबद दोन दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.
माजी उपसरपंचानं केली आत्महत्य
लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा येथले माजी उपसरपंच व्यंकट ढोपरे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह शिरूर अनंतपाळ इथल्या तहसील कार्यालयात ठेवण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याने तात्काळ सरकारने आरक्षण द्यावं, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० लाखांची मदत जाहिर करावी,या मागण्या घेऊन सकाळपासून व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह तहसील कार्यालयात ठेवलाय.