विट्यात खानापूर रस्त्यावरील गेस्ट हाऊस समोर असणाऱ्या हे ईश्वरा या उथळे यांच्या घरात घरगुती वादातून महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. तोंडावर खोऱ्याने वार केल्यामुळे रक्तबंबाळ झालेली महिला जागीच झालेली आहे. सदर मारहाण करणारा पुरुष आणि महिला हे पती-पत्नी आहेत की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत आहेत याबाबत पोलीस तपास करत आहेत.
भाड्याने राहण्यासाठी कोठे जायचे? या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून खून केल्याची घटना विटा (ता.खानापूर ) येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, खानापूर नाका विटा, ता. खानापूर) असे मृत पत्नीचे तर गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, मूळ याडहळ्ळी, ता. शोरपुरा, जि. यादगीर, कर्नाटक, सध्या विटा ता. खानापूर) असे संशयित आरोपी पतीचे नांव आहे. याप्रकरणी गुराप्पा यास ताब्यात घेऊन अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले. याबाबत पोलिस महेश अरूण संकपाळ यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले, की मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील गुराप्पा व त्याची पत्नी सलमा विटा येथे खानापूर नाका येथील विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते.काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता.
बुधवारी ३ जुलै रोजी रात्री आठ वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे या कारणावरून वादावादी सुरू होती. याचदरम्यान रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. यामध्ये सलमा जागीच ठार झाली. घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाने आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा सुरू केला.
या मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. मृत महिलेचे नाव सलमा असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत महिलेच्या मोबाईल मधील फोन डिटेल्सची माहिती घेऊन सदर घटनेची माहिती मृत सलमाच्या भावाला देण्यात आलेली आहे.