‘न्याय आपल्या दारी’: पंढरपूर तालुक्यात फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबीर

समाजातील तळागाळातील तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट ठेवून सर्वोच्च न्यायालय यांच्या ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून सुरु केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यात दि. २७ ते दि.३१ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी दिली आहे.

तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या हस्ते लोक अदालत व कायदे विषयक शिबीरासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई येथून आलेल्या व्हॅनचे उद्घाटन दि. २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. फिरते लोकअदातीची व्हॅन ही तालुक्यात दि. २७ ते दि.३१ ऑक्टोबर या कालावधीत कासेगांव, रोपळे व कोर्टी या ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे.

सदर फिरते लोक अदालत हे तालुक्यातील नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बँकांचे, विमाकंपनी, विद्युत महामंडळ, व इतर दिवाणी दाखलपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराव्दारे जनजागृती केली जाणार आहे. फिरते लोक अदालतीमध्ये संबधीत गावच्या जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी केले आहे.