बोरगाव येथे पावसाचे पाणी साठून शेकडो एकर शेती बनली नापीक

बोरगाव (ता. वाळवा) येथील शेकडो एकर जमीन वर्षानुवर्षे पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने नापीक व क्षारपड बनत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सछिद्र निचरा प्रकल्पासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.बोरगाव येथील जवळपास ४० टक्के शेतजमिनीवर पावसाळ्यात तब्बल पाच ते सहा महिने पाणी साचून राहते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात बोरगाव (ता. वाळवा) येथे पावसाचे पाणी साचल्याने शेतजमीन नापीक बनत आहे. पिके कुजण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी शेकडो एकर जमीन क्षारपड बनत चालली आहे.

परिसरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला नाले नाहीत.बऱ्याच ठिकाणची शेती खळग्यात असल्याने चारी बाजूने उंचवटा व मध्येच खोलगट भाग असल्याने पाणी साठून राहते. मध्यंतरी शासकीय योजनेतून क्षारपड शेती पिकाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, राज्यातील सत्ता बदलानंतर त्याला ब्रेक लागला. गावची वाढती लोकसंख्या व घटते जमीन क्षेत्र यामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.गावातील शेती वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी होत आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीन ठिकाणी सछिद्र निचरा प्रकल्प उभारले.

मात्र, उर्वरित जमीन क्षेत्र मोठे असल्याने यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.शेतकरी नापीक जमिनीमुळे कर्जबाजारी बनत आहे. सछिद्र प्रकल्पच येथील शेती शेतकरी वाचवू शकतो. सर्वांनी हा प्रकल्प राबविण्यासाठी सहकार्य व राजकारणविरहित व एकसंघपणाने प्रयत्न करायला हवेत. बोरगावच्या चारही बाजूंनी साखर कारखान्यांचे जाळे आहे. कारखानदारांनी मनावर घेतले, तर निचरा प्रकल्पाच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना वाचवू शकतात.