इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यांने वाढ होत असल्यामुळे सोमवारी सकाळी जुना पूल वाहतूकीस बंद केला. महापालिका प्रशासनाकडून जुना पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे हुपरीकडे जाणारी वाहतूक आता नव्या पुलावरुन सुरू झाली आहे.पावसाने आज दिवसभर दडी दिली असली तरी पाणलोट क्षेत्रात पावसांची रिपरिप सुरूच आहे.
त्यामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. गेल्या २४ तासात तीन फुटाने आज दिवसभरात १ फुटांने पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडत असून घाट परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. वरद विनायक मंदिराजवळ पाणी आले असून पावसाची तीव्रता कायम राहिल्यास स्मशान भूमीत पाणी शिरण्याची शक्यता आहे.पाण्याच्या पातळीत एक ते दीड फूट वाढ झाल्यास जून्या पूलावर पाणी येण्याची शक्यता आहे. सांयकाळी ५७. १ फुटावर पाण्याची पातळी होती.
मात्र, आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे पाण्याच्या पातळीत संथ गतीने वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे. हळूहळू पाणी पात्राबाहेर पडत आहे. तर नदी पुलावर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी नदीकाठावर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे वाहन व सोबत चार जवान तैनात केले आहे. तर यांत्रिक बोट कार्यान्वीत करण्यात आली असून त्यावर १२ जवान कार्यरत असणार आहेत.