इचलकरंजी महानगरपालिकेत सहा दिवस राहणार सुनावणी सुरू

इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या वतीने १२ मार्च २०२४ रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये मैदान, प्राथमिक शाळा, बगीचा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, टाऊन हॉल, ग्रंथालय, खुली जागा, पार्किंग आदींसह विविध कारणांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. तब्बल २२९ आरक्षणे टाकण्यात आली असून त्याची किंमत सुमारे १७०० कोटींच्या घरात आहे.

या आराखड्याद्वारे शहराच्या विकासासाठी तीन हजार हेक्टर क्षेत्रावर आरक्षण टाकण्यात आले आहे. या आरक्षणामध्ये पूर्वीचीच आरक्षणे कायम करण्यात आली असून काही नवीन आरक्षणेही चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आली आहेत. अशा विविध कारणांवरून नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने प्रारूप विकास आराखड्यावर हरकतीच्या मुदतीत तब्बल १६६० जणांनी हरकती दाखल केल्या आहेत.

चार महिन्यांपासून दाखल या हरकतींवर सुनावणी होत नसल्यामुळे माजी नगरसेवक संजय जाधव यांच्यासह नागरिकांनी निवेदन देऊन सुनावणी तातडीने घेण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने नगरविकास विभागाने विकास आराखड्यावरील हरकतींबाबत ३० जुलैपासून सुनावणीला सुरुवात केली आहे. ३० जुलै ते १ ऑगस्ट व ६ ते ८ ऑगस्ट असे सहा दिवस ही सुनावणी घेण्यात येणार आहे.