कोबी पीक लागवड विषयक महत्वपूर्ण माहिती!

कोबी या भाजीपाला पिकास वर्षभर बाजारात मोठया प्रमाणात मागणी असते.त्यामुळे पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कोबी पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम व चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारपट जमिनीत लागवड करणे टाळावे अन्यथा जास्त रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच पिकाच्या वाढीसाठी थंड आणि आद्रता असलेले वातावरण पोषक आहे. गड्डा तयार होण्यासाठी किमान १५ ते २१ डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. कोबी पिकाच्या लागवडीसाठी एकरी किमान १०० ते १२० ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. लागवडीसाठी युरो २, सेंट, बॉर्डर ७७७, डॉलर यांसारख्या वाणांची निवड करून गादीवाफा अथवा कोकोपीट ट्रे मध्ये योग्य पद्धतीने दर्जेदार रोपे तयार करावी.

कोबी पिकाची लागवड ही आपला जमिनीचा प्रकार, उतार आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सरी वरंभा अथवा सपाट वाफ्यावर करावी. बेड तयार करताना सुरुवातीला जमिनीमध्ये मुबलक चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड २०० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, युरिया ५० किलो, पोटॅश ५० किलो एकरी द्यावे. लागवड करताना लवकर येणाऱ्या वाणांसाठी दोन ओळींमधील अंतर ४५ सेंमी व दोन रोपांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. तसेच उशिरा येणाऱ्या वाणांसाठी दोन ओळींमधील अंतर ६० सेंमी व दोन रोपांमधील अंतर ४५ सेंमी ठेवावे.

लागवडीसाठी २२ ते २५ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी आणि रोपे लागवडीपूर्वी क्विनॉलफॉस कीटकनाशक आणि मॅंकोझेब बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावी. लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकात हलकी खुरपणी करावी व मुबलक खतांची मात्रा देऊन हलकी भर लावावी व जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. कोबी पिकात कोबी पतंग, पाने खाणारी अळी, मावा, सफेद माशी, करपा, मर, डाऊनी मिल्ड्यू, व इतर रोगांचे व किडींचे सुरुवातीपासूनच नियोजन करावे. रसशोषक किडींसाठी पिकात चिकट सापळ्यांचा वापर करावा. वरील पद्धतीने नियोजन केले तर वाणांच्या कालावधीनुसार लागवडीपासून ६० ते ७० दिवसांत पिकाची काढणी येते.