कोल्हापुरात डेंगू चे रुग्ण वाढले….

उघडीप देत पडणाऱ्या पावसाने शहरात डेंगी तसेच चिकुनगुनियासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातून डेंगी रुग्णांची वाढती संख्या समोर येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डेंगी व चिकुनगुनियासाठी विविध ठिकाणचे ३१ परिसर धोकादायक म्हणून निश्‍चित केले असून, त्यानुसार वारंवार सर्व्हे केले जात आहेत.आठवड्यात घेतलेले रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले जात आहेत. यातून रुग्णांची संख्या दिसून येत असली तरी त्यापेक्षा किती तरी जादा तापाचे रुग्ण खासगी रुग्णालयात जातात.

तिथे खासगी प्रयोगशाळेतून डेंगीबाबतचे अहवाल पाठवले जात असले तरी त्याला सरकारी पातळीवर मान्यता दिली जात नाही. पण, तापाचे रुग्ण ज्या भागात आढळतात, तिथे महापालिकेची यंत्रणा सर्व्हेला जात आहे.सर्व्हे करताना प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील भागात कर्मचारी जात आहेत. पण, प्रत्येक केंद्राने यापूर्वी त्या परिसरात सापडलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून काही परिसर धोकादायक (जोखमीचे) ठरवले आहेत. या परिसरात पथकांच्यावतीने अगदी काटेकोर तपासणी केली जात आहे.त्याचबरोबर काही नवीन पथकेही त्या भागात तपासणीसाठी अचानक पाठवली जात आहेत.

त्यातून तेथील रुग्णसंख्येची वस्तुस्थिती लक्षात घेतली जात आहे. जिथे संख्या जास्त जाणवते, तिथे सफाईबरोबरच धूर, औषध फवारणी, गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही केली जात आहे.२७५ आशा कर्मचारी सर्व्हेसाठी आहेत. भागातील घरांना भेट देऊन जास्तीत जास्त वेळा तपासणीचे आदेश दिले आहेत. तसेच डास अळ्या सापडलेली भांडी, रक्ताचे नमुने यांच्या संख्येचा आढावा सतत घेतला जात आहे.