इचलकरंजीला दररोज की आठ दिवसातून पाणी पुरवठा!

इचलकरंजी शहराला पाण्याची मोठी समस्या असतानाही पाणी मुबलक आहे, असे आम. प्रकाश आवाडे म्हणतात. आम. आवाडे यांना मुबलक पाणी आहे की नाही ?, शहर पाण्यापासून वंचित आहे की नाही ? शहराला आठ-आठ दिवसातून पाणी येते की नाही ? की दररोज पाणी पुरवठा होतो याचा त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.

दिलेल्या पत्रकात इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यास आम. प्रकाश आवाडे हे सातत्याने अपयशी ठरले आहेत. स्वत:चे अपयशाचे कारण ते महानगरपालिका प्रशासनावर फोडत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, शहरवासियांचा रोष आपल्यावर येऊ नये त्यासाठी विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आवाडे कुटुंबियांनी आमदार, खासदार, नगराध्यक्षपदही भूषविले आहे मात्र इचलकरंजीच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. एखादी योजना आणली, निधी आणला तर मात्र आपणच आणला असे वातावरण केले जाते. तसेच श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एखादे काम मार्गी लागले नाही तर प्रशासनाला जबाबदार धरायचे आवाडेंची ही दुटप्पी भुमिका जनता ओळखून आहे.

आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या बदलीसाठी शासन दरबारी ताकद लावून आपला मर्जीतील अधिकारी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न आम. आवाडे यांनी केला पण आयुक्त दिवटे हे सक्षम व चांगले अधिकारी आहेत. बेकायदेशीर कामांना त्यांनी लगाम लावला आहे. आर्थिक शिस्त व घडी बसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असताना आपले अपयश झाकण्यासाठी विनाकारण त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे.