केसरी गॅंगमधील तिघांवर हद्दपारची कारवाई करत वर्षासाठी जिल्हाबाहेर रवानगी केली आहे. तरीही यातील तिघेजण शहरात अनेकदा मिळाले आहेत. मागील महिन्यात चंद्रकांत आळेकट्टी व अमोल कामते दोघे हद्दीपारीनंतरही घरात मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पुन्हा अमोल कामते हा हद्दपार असतानाही शहरात आला. फिर्यादी आकाश शिंगारे याच्या घराच्या दारात उभारला व मोठमोठ्याने दंगा करत दहशत करू लागला.
माझ्यावर अगोदरच भरपूर केसेस आहेत, माझ्या विरोधात इचलकरंजी पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे, तक्रार ही खोटी दिली होतीस असे न्यायालयात सांग, अन्यथा अन्य प्रकरणात अडकवून टाकीन तसेच तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने शिंगारे याला दिली. याप्रकरणी शिंगारे यांच्या फिर्यादीनुसार अमोल कामते याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.
हद्दपार असताना केसरी गँगचा गुंड इचलकरंजी शहरात आला. आसरानगर भागात एकाच्या दारात उभे राहून पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार खोटी आहे, असे न्यायालयात सांग, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत दहशत माजवली. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अमोल ऊर्फ रवींद्र शिवाजी कामते (वय २४, रा. आसरानगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची फिर्याद आकाश विजय शिंगारे (२५) याने पोलिसांत दिली. कामते याच्यावर जबरी मारहाण व खंडणीसारखे गावभाग व शहापूर पोलिस ठाण्यात गंभीर पाच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, कामते याच्या शोधासाठी गेल्यानंतर हद्दपार असतानाही केसरी गँगचा म्होरक्याही पोलिसांना मिळाला. राहुल शिवाजी केसरी (रा. आसरानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. हद्दपारीच्या कारवाईनंतरही केसरी गॅंगवर सलग दोन महिन्यांत झालेली ही दुसरी कारवाई आहे.