जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळी ओसरू लागली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळी तीन फुटाने कमी झाल्याने २३ बंधारे मोकळे झाले आहेत.आणखी दोन दिवस, असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपासून आकाश मोकळे दिसत होते. दिवसभरात ऊन राहिले, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी व चंदगड तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळी ओसरू लागली आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सकाळी पंचगंगा नदीची पातळी ३२.११ फूट होती, दिवसभरात पाऊस नसल्याने ती २९.११ फुटापर्यंत खाली आली होती. आता २८ बंधारे पाण्याखाली आहेत, आज बुधवारपर्यंत आणखी बंधारे मोकळे होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. जिल्ह्यात १३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, आज व उद्या गुरुवारी उघडझाप राहणार असून शुक्रवार (दि. १२) पासून पाऊस जोर पकडेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.