शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना विजयाची हॅट्ट्रिक साधण्यात मुस्लिम मतदारांनी नेहमीच साथ दिली. खासदार होण्यातही मुस्लिमांचा मोठा वाटा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवारास संधी द्यावी, अशी मागणी रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, जुबेर कुरेशी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.तर दुसरीकडे दक्षिण सोलापुरातून महादेव कोगनुरे यांना संधी द्यावी, अशी मागणी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी केली आहे.शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात एक लाखांवर मुस्लिम मतदार आहेत. आतापर्यंत मुस्लिम बांधव कायमच काँग्रेसच्या म्हणजेच प्रणिती शिंदेंच्या पाठीशी राहिला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंसमोर विरोधकांचे कडवे आव्हान असतानाही त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यात मुस्लिम मतदारांचा मोलाचा वाटा राहिल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी श्री. शिंदे यांना सांगितले.तसेच लोकसभा निवडणुकीत ‘शहर मध्य’मधील ६७ हजार मुस्लिम बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना दिल्लीत पाठविले. ५० वर्षांपासून मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी राहिला असून आतापर्यंत या मतदारसंघामधून काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवारास संधी मिळालेली नाही. मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची मतांची ताकद पाहता काँग्रेसने हा मतदारसंघ मुस्लिम उमेदवारासाठी सोडवा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. एम. के. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदारसंघातील अनेकांना मदत केली आहे. ऐन लोकसभेला त्यांना भाजपकडूनही ऑफर असताना देखील त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास दक्षिण सोलापूरसह उत्तर सोलापूर व हद्दवाढ भागातील नागरिकांची साथ काँग्रेसला मिळेल. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल आणि काँग्रेसची ताकद देखील वाढेल, असेही हसापुरे यांनी श्री. शिंदे यांना निवेदनाद्वारे सांगितले.