रिक्षा आणि माल वाहतूक वाहनांना परवाना नूतनीकरण विलंब शुल्क अन्यायकारक आहे. तो सरकारने रद्द करावा, अशी विनंती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.त्यांनी ‘सरकार या घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, लवकरच न्याय निर्णय घेतला जाईल,’ अशी ग्वाही दिली.सांगली जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. विधानभवनात उपमुख्यमंत्री कार्यालयात ही भेट झाली. पृथ्वीराज यांनी परवाना नूतनीकरण शुल्काने रिक्षा व वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रिक्षाचालक-मालक हा सामान्य कुटुंबातील घटक आहे.
त्याचे हातावर पोट आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घर खर्च याचा ताळमेळ घालताना या घटकाची सातत्याने ओढाताण होत आली आहे. या घटकांना रिक्षा परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास दर दिवसाचा पन्नास रुपये दंड आकारला गेला आहे. तो रिक्षाचालकांना परवडणारा नसून त्यांचा संसार अडचणीत येईल.दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांनी आयुष्यभर रिक्षाचालकांसाठी संघर्ष केला. या घटकांवर अन्याय होत असताना ते रस्त्यावर उतरले. रिक्षाचालक-मालकांबाबत अयोग्य निर्णय होऊ नये, अशी सगळ्यांची भावना आहे, अशी विनंती श्री. पवार यांनी केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करत आहे. रिक्षाचालकांची या करातून सुटका करून देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. अतिरिक्त शुल्क माफ करण्याबाबत सरकार पावले उचलेल