मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून जालन्यात पुन्हा उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाची तरूण मंडळी रस्त्यावर उतरली आणि आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी यांना मराठा आरक्षण मिळाल्याखेरीज गावात प्रवेश (नो एन्ट्री ) द्यायचाच नाही, असा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. सोमवारी सांगोल्यात तरुणी, महिलांनी साखळी आंदोलनात सहभाग घेत सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाज बांधव आक्रमक होत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. गावागावात राजकीय पुढार्यांना प्रवेश बंदी करत मतदानावर बहिष्कार टाकून सरकार विरोधात मराठा बांधव आपला रोष व्यक्त करताय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा संवेदनशील झाला आहे. दरम्यान आंदोलनाची झळ बसू लागताच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांवर कार्यक्रम रट करण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर राजकारण-समाजमन ढवळून गेले आहे. मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत २४ ऑक्टोबर रोजीच संपली.
त्यानंतर बुधवारपासून पुन्हा एकदा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यास गावात प्रवेश नसल्याचे बोर्ड झळकू लागले आहेत. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष….. मराठा आरक्षण एकच लक्ष सरकारला दिलेल्या आरक्षणासाठीची डेडलाईन संपल्याने मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाने गावागावात बॅनर्स, पोस्टर्स लावून मंत्री, खासदार, आमदारांसह नेत्यांना गावबंदी केली आहे. चुलीत गेले नेते अन चुलीत गेले पक्ष अस या बॅनर्सवर लिहिलं आहे.
नेते येताच त्यांना गावातून हुसकावून लावलं जात आहे. आरक्षण देत नाही तोपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही, असं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मराठा आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील कलासमध्ये दीपक पवार, अचकदाणीमध्ये विजय पाटील, पाचेगावमध्ये नवनाथ यादव, संजय भोसले यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तर सांगोला शहरासह तालुक्यातील अकोला, संगेवाडी, आलेगांव, मानेगांव, एखतपूर, धायटी, वासूद, मेडशिंगी, मांजरी, बाबरे, हंगरगे, मद, डोंगरगाव यासह अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून साखळी उपोषण सुरू केले आहे.
चिणके, खिलारवाडी गावात मशाल मोर्चा काण्यात आला. रत्नागिरी सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच वासूद ग्रामपंचायत सदस्या आशा अरविंद केदार आणि गायगव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच नवनाथ पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून कायदा करून आरक्षण मिळेपर्यंत सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाचेगांव खुर्द गावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यांसह सर्व प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.