शासकीय कागदपत्रांसाठी सामान्य नागरिकांना नाहक त्रास

सरकारी तसेच रेशन कार्डची कामे करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांमधून लोक हातकणंगले येथे पुरवठा कार्यालयात येत असतात. नाव वाढवणे तसेच रेशन कार्ड दुबार करणे, विभक्त रेशन कार्ड करणे यांसारखे अनेक कामांसाठी दररोज अनेक नागरिक खेलपाटे घालत असतात. पण काही ठराविक लोकांची कामे मार्गी लागतात. बाकीच्यांना मात्र दररोज पुरवठा कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात.

जाणून-बुजून काही लोकांकडून सामान्य नागरिकांची अधिकाऱ्यांशी भेट होऊ दिली जात नाही. कामासाठी वारेमात पैशाची मागणी केली जात आहे. यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कोणतेही अधिकारी नसणारे खाजगी एजंट यांच्या सुळसुळाटामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अशा प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.