आमदार शहाजी बापू पाटील आज जाणार विधानभवनात …

शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार निवासात मुक्कामाला होते. ते थोड्याच वेळात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल होतील, अशी माहिती आमदार शहाजी पाटील यांचे निकटवर्तीय रफीक नदाफ यांनी दिली. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात महायुतीच्या नऊ, तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूच्या उमेदवारांसाठी एक एक मत महत्वाचे आहे, त्यामुळे सर्व आमदारांचे मतदान होण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात ॲडमिट होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी ते गुरुवारीच मुंबईला आले आहेत. ते सध्या मुंबईतील आमदार निवास स्थानात मुक्कामी होते.

आमदार शहाजी पाटील यांचे विश्वासू सहकारी रफीक नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार शहाजी पाटील हे थोड्याच वेळात विधान परिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात जाणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेली चर्चा ही निरर्थक आहे. बापूंची तब्येत ठणठणीत आहेत, असेही नदाफ यांनी स्पष्ट केले.