पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशाला संबोधित करत एक उत्स्फूर्त भाषण केलं. देशानं आतापर्यंत गाठलेला प्रगतीचा टप्पा अधोरेखित करताना त्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या योजनेकडेसुद्धा सर्वांचं लक्ष वेधलं. पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या या योजनेचा थेट लाभ देशातील युवा वर्गाला होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ असं पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेचं नाव असून, याचा लाभ देशातील कोट्यवधी युवांना घेता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाची बाब म्हणजे हा फायदा सरकारी नोकरी करणाऱ्यांना मिळणार नसून खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना मिळणार आहे. खासगी क्षेत्रात नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण करत या क्षेत्रात नोकरदार युवांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून केंद्राकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत तरुणांना पहिल्यांनाच नोकरी मिळाल्यानंतर 15000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. यापूर्वी केंद्रानं सदर योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इंसेंटील नावानं लाँच केली होती, ज्यानंतर तिचं नामकरण करत विकसित भारत योजना अशी नवी ओळख या योजनेला देण्यात आली. ईपीएफओकडून ही योजना चालवली जाते.
पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या या योजनेचा लाभ त्या युवा वर्गाला मिळणार आहे ज्यांना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान नोकरी मिळेल. खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून PF ची रक्कम वजा होते त्यांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणखी एक अट म्हणजे इथं नोकरदार व्यक्तीचा पगार 1 लाख रुपयांहून कमी असावा. केंद्र शासनाकडून या योजनेअंतर्गत दोन भागांमध्ये रक्कम खातेधारकांच्या खात्यावर जमा केली जाईल, जिथं पहिला हफ्ता नोकरीच्या पहिल्या 6 महिन्यांच्या आतच जमा केला जाईल.
