लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागले असून येत्या काही महिन्यातचया निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली आहे, त्यापैकीच एक म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही आहे.या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान आता या योजनेसंदर्भात आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेली जुन्या योजनांबाबतची लाभार्थी महिलांची माहिती ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राबवण्यासंदर्भात विविध सरकारी विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्याच बैठकीदरम्यान विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे योजना राबवण्यावर चर्चा झाली असे समजते. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.
1 जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसत आहेत.या योजनेसाठी महिलांची माहिती जमव्यासाठी जे कष्ट लागतील ते कमी करण्यासाठी विविध सरकारी विभागांकडे असलेली माहिती वापरण्याची कल्पना आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा या विभागांकडे अनेक जुन्या योजनांसाठी लाभार्थी महिलांची संकलित केलेली माहिती आहे. त्यामुळे तीच माहिती आता महिला आणि बालविकास विभागाला द्यावी, अशी सूचना संबंधित विभागांना देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येणार आहे.