जयंतरावांशी दादांचं गुफ्तगू! चर्चांना उधाण…….

 लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जांगासाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 246 मतदान झाले असून या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसतखेळत गप्पा पाहायला मिळाल्या आहेत. विधानभवनात मतदानासाठी आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसत-खेळत गप्पा मारल्यानंतर या भेटीचे व्हिडिओ समोर आले आहेत.

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी जयंत पाटलांशी (Jayant Patil) मत हातात हात देऊन गप्पा मारल्या आहेत. तर, संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. दररोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊतांनी चक्क उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात हात घातल्याचं पाहायला मिळालं. 

सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो. मात्र, जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात, एकेमकांशी गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावेळी असे अनेक प्रसंग, क्षण पाहायला मिळाले आहेत. 

अजित पवार यांचा संजय राऊतांसमवेतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून अजित दादांनी संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं. तर, जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तगू केल्याचं दिसून आलं. विधानपरिषदेतील या दोन्ही भेटीवरुन राजकीय अर्थ लावले जात आहेत. मात्र, ही केवळ अनावधानाने झालेली भेट असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.