डॉ.प्रकाश आमटे यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023 पुरस्कार जाहीर

शाहू उद्योगसमूहाचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत सामाजिक कार्य अविरतपणे करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज २०२३ पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील ‘हेमलकसा’सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५० वर्षांपासून आदिवासी जनतेची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला. याबाबतची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता येथील शाहू शिक्षण संकुलच्या पटांगणावर ”छत्रपती शाहू लोकरंग महोत्सव २०२३” कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

१९७३ पासून माडिया आणि गोंड आदिवासी जनतेला लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे व पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे अहोरात्र सामाजिक सेवा व वन्य प्राण्यांच्या संवर्धनात व्यस्त आहेत. लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी हॉस्पिटल, निवासी आश्रमशाळा, जखमी वन्य प्राण्याच्या संरक्षणासाठी अनाथालय, ज्येष्ठांसाठी उत्तरायण, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. शासनाने त्यांना आदिवासीसेवक पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार विशेष म्हणजे भारत सरकारने ”पद्मश्री” अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.