मराठा आंदोलनामुळं कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद

महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मंगळवारी (ता. ३१) अचानक आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, विशाळगड, नाशिकसह विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेस मंगळवारी (ता. ३१) बंद ठेवल्या. विविध आगारातून येणाऱ्या बसेस निपाणी बसस्थानकात येऊन पुन्हा परत जात होत्या.

त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी, मजूर व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यांना खासगी वाहने व दुचाकीचा आधार घ्यावा लागला. तर अनेकांनी घरी जाणे पसंत केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कर्नाटकाच्या सीमाभागात धावणाऱ्या विविध बसेस बंद केल्या.

निपाणी बसस्थानकातून पुढे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेस बंद असल्याची माहिती प्रवासी, मजूर व कामगारांना निपाणीत आल्यानंतर कळाल्याने त्यांचा गोंधळ उडाला. महाराष्ट्र बस निपाणी बसस्थानकात बंद झाल्यानंतर महाराष्ट्रातील बस फलाटावर प्रवाशांचा शुकशुकाट दिसत होता. निपाणी, बेळगाव, हुबळीसह विविध आगारातील कोल्हापूर जाणा-या बसेस निपाणीतून पुन्हा मागे जात होत्या.

चालक-वाहकांना कर्नाटकात सेवा

निपाणीसह विविध आगारातून महाराष्ट्रातील विविध मार्गावर जाणा-या सेवा बजावणा-या चालक-वाहकांना कर्नाटकात विविध मार्गावर सेवा दिली जात होती. त्यामुळे कर्नाटकात विविध ठिकाणी जाणा-या प्रवाशांची सोय झाली.

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील वातावरण दिवसेंदिवस बदलत चालले आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरजसह सर्व मार्गावरील बसफेऱ्या बंद केल्या आहेत.

दृष्टिक्षेपात…

  • दिवसाकाठी महाराष्ट्रातून चिक्कोडी विभागाला मिळणारे उत्पन्न २० लाख
  • चिक्कोडी विभागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस ३६०
  • कोल्हापूर, पुणे मार्गावर धावणाऱ्या बसेस १५०
  • चिक्कोडी विभागातून मिरज मार्गावर जाणाऱ्या बसेस २१०