हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे अतिक्रमणाबाबतीत तणाव, ग्रामपंचायतीकडून स्थगिती

सध्या अनेक भागात अतिक्रमणाचा विळखा खूपच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या अतिक्रमणविरोधी मोहीम सध्या अनेक भागात राबविली जात आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे अतिक्रमणाबाबतीत असाच तणाव पहायला मिळाला. रांगोळी गावातील माळभाग मेन रोडजवळ असलेल्या सर्विसिंग सेंटरवर अतिक्रमणाचा आरोप करत एका शेतकऱ्याने ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे संबंधित जागेवर कारवाई करण्यासाठी प्रशासन सरसावले होते.

मात्र, पोलीस हस्तक्षेपामुळे कारवाई काही काळासाठी थांबवण्यात आली. रांगोळी येथील देसाई या शेतकऱ्याने २०१४ पासून सुरू असलेल्या अविनाश माने यांच्या सर्विसिंग सेंटर विरुद्ध लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने नियोजन आखले होते. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनाही बोलावण्यात आले होते.

सर्विसिंग सेंटरचे मालक अविनाश माने यांनी २०१४ मध्येच ग्रामपंचायतीकडून संमतीपत्र घेतले असून, त्यांना अधिकृत पावती आणि दोन नळजोडणी मिळाल्याचा दावा केला. मात्र, काही दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता हे नळ कनेक्शन बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या कारवाई दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी हस्तक्षेप करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कोणतीही कारवाई न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सर्व्हिसिंग सेंटरवरील जेसीबी कारवाई थांबवावी लागली. रांगोळी गावात अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले असताना केवळ एकाच व्यक्तीला लक्ष्य करून कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली.

त्यामुळे गावातील सर्व अतिक्रमणांविरोधात एकसंध भूमिका घेऊन रांगोळीला अतिक्रमणमुक्त करणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाचा पुढील तपास करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. भविष्यात गावातील सर्व अतिक्रमणांवर समान न्यायाने कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.