धाबे, दारू दुकाने, बिअर बार आणि हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना…..

 शिवनाकवाडी येथे श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेस मंगळवार दि. ४ फेब्रुवारी पासून आरंभ झाला. मंगळवारी दुपारी गव्हाची खिर, भात, आमटी आणि आंबिल अशा पदार्थांचा महाप्रसाद झाला. रात्री नागरिकांनी आपापल्या घरात भोजन केले. पण, मंगळवारची मध्यरात्र संकट घेऊनच उभी राहिली आणि बुधवार सुरु झाल्यापासून शिवनाकवाडीतील घराघरातील ग्रामस्थांना अचानक घाम येऊ लागला, उलट्या सुरु झाल्या, जुलाबही सुरु झाले. यामुळे लोक भयभीत झाले, ग्रामपंचायतीच्या मोकळ्या आवारात जमले, क्षणात रुग्णालय गाठले, रुग्णालयेही खचाखच भरली. शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेत जवळपास १००० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली.

शिवनाकवाडी गावात तहसीलदार, आरोग्य अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व धाबे, दारू दुकाने, बिअर बार आणि हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने हा निर्णय गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.