खानापूर मतदारसंघात चर्चांना उधाण! वंचित फॅक्टरचा फटका….

राज्यात आरक्षण प्रश्नावरून मराठा ओबीसी असा वाद सुरू असताना खानापूर मतदारसंघात वंचित आघाडीचा स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी खानापूर मतदारसंघातून संग्राम माने यांच्या सारख्या ओबीसी नेत्याला मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. ओबीसी समाजाचे नेते संग्राम माने यांनी नुकतेच पुणे येथे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे वंचित फॅक्टरचा दणका कोणाला बसणार ? अशी चर्चा सुरू आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा आणि आंबेडकर यांची जाहीर सभा यामुळे विशाल पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.

या विजयानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवल्याचे दिसून येत आहे. खानापूर मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे. मात्र खानापूर मतदारसंघात ओबीसी समाजाचे मतदान अंदाजे १ लाख ८० हजार ते दोन लाख इतके आहे. तसेच अनुसूचित जाती जमातीचे मतदान देखील लक्षणीय आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संग्राम माने खानापूर विधानसभेच्या मैदानात उतरले तर ते विजयापर्यंत पोहोचतील की नाही ? हे सांगता येत नाही मात्र वंचित आघाडीच्या पाठीमागे संग्राम माने हे निश्चितपणे लक्षणीय मते घेतील आणि किंग मेकरच्या भूमिकेत समोर येतील. असे झाल्यास संग्राम मानेंच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार ? याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे.