सांगोल्यात आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

रविवारी म्हणजेच 21 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सांगोल्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमांची सुरुवात ही आज शुक्रवार 19 जुलैपासून होणार आहे. नाम साधना मंडळ सांगोला यांच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
म्हणजे सकाळची उपासना, प्रवचन, भजनसंध्या, सनई वादन, कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

यामध्ये आज शुक्रवारी 19 जुलैला सायंकाळी साडेसहा ते साडेआठ ह. भ. प. श्री सूर्याची महाराज भोसले पंढरपूर यांचे प्रवचन होणार आहे. तसेच शनिवारी 20 जुलैला सायंकाळी साडेसहा ते साडेआठ भजन संध्या व सनई वादन होणार आहे.

रविवारी 21 जुलैला सकाळी साडेसहा ते साडेसात सकाळची उपासना व गुरुजनांचा सत्कार ध्यान मंदिरात होईल. तसेच सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत ह. भ. प. श्री संकेत भोळे बडोदा यांचे नारदीय कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ श्री. दयानंद बनकर तर तबल्याची साथ श्री. सुधाकर कुंभार करणार आहेत.

21 जुलैला म्हणजेच रविवारी कीर्तन झाल्यावर महाप्रसाद होणार आहे. हे सर्व कार्यक्रम ध्यानमंदिर वाढेगाव रोड सांगोला येथे होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामसाधना मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.