सुळकुड योजनेसंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर आमदार राहुल आवाडे यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्यांनी इचलकरंजी शहरासाठी अमृत २.० अंतर्गत राज्य शासनाने १६० कोटी खर्चाची सुळकूड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे. परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही योजना थांबली आहे. तर कृष्णा पाणी योजना जलवाहिनी बदलाचे काम मुदत संपली तरी अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या इचलकरंजीवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या शहराला ७० एमएलडी पाण्याची गरज असताना कृष्णा योजनेतून ३६ एमएलडी तर पंचगंगा योजनेतून ९ एमएलडी पाणी उपासा केला जातो.

इचलकरंजी पंचगंगा नदीकाठावर असूनही ती प्रदूषित झाल्याने पाण्यासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. त्यामुळे सुळकूड योजना संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुळकूड योजना संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

त्याचबरोबर आमदार आवाडे यांनी, सन २००१ मध्ये अस्तिवात आलेल्या कृष्णा योजनेची जलवाहिनी अत्यंत जुनी झाल्याने जीर्ण झाली आहे. त्यामुळे १८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलाचे काम तीन टप्प्यात हाती घेतले आहे. त्यातील पाच किलोमीटर जलवाहिनी बदलाचे काम हे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यावरून संबंधित इलेकॉन एनर्जी हे मक्तेदार अकार्यक्षम असल्याचे दिसते. त्यांना जून २०२३ मध्ये वर्क ऑर्डर दिली असून आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ दिली गेली.

ती सुद्धा फेब्रुवारी २०२५ मध्ये संपली असल्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा करत त्या मक्तेदाराची वर्कऑर्डर रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी १.९ किलोमीटर जलवाहिनी बदलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधिताना दिले जातील असे सांगितले.