कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांकडून EVM मतमोजणीवर शंका उपस्थित केली जात आहे. राज्यभरात महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाल्याने ईव्हीएम विरोधात लाट उसळी आहे. दरम्यान त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाचही पराभूत उमेदवारांनी VVPAT ची मते पुन्हा मोजावीत अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्कही उमेदवारांनी भरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कोल्हापूर दक्षिण हातकणंगले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघ आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील व्हीव्हीपॅटची मतमोजणी व्हावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस आणि उमेदवारांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला खास करून काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झालं होतं.असं असतानाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र, हा पराभव अमान्य करत राज्यातील काही काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही तितकेच यश होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीत फरक दिसत असल्याचं राज्यभरातून समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी केली आहे.