कबनूरचा ग्रामविकास अधिकारी लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात….

कोल्हापूर येथे जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत सोमवारी सायंकाळी कामाची वर्कऑर्डर देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडून हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांना ९ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. या प्रकरणी त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने महसूल विभागासह कबनूर येथे मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संबंधीत तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत.

त्यांनी कबनूर गावातील वॉर्ड नं. २ मधील वाढीव पाईपलाईन बसविण्याच्या कामाची निविदा भरली आहे. निविदेप्रमाणे कामाची विचारणा करण्यासाठी संबंधीत तक्रारदाराने ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामाचे वर्कऑर्डर देण्यासाठी त्यांच्याकडे ९ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार संबंधीत विभागाने सोमवारी सायंकाळी सापळा रचून जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांना ९ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पो. नि. बापू साळुंखे, पोहेकॉ सुनिल घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार यांच्या पथकाने केली.